आपला जिल्हामहाराष्ट्र

भि.ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार जाहीर

संपादक मनिष जाधव 9823752964

Follow
( 0 Followers )
X

Follow

E-mail : *

 भि.ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार जाहीर

कोपरगाव समाधान भुजाडे / मनिष जाधव
पोहेगाव, ता. कोपरगाव येथील भि.ग. रोहमारे ट्रस्टतर्फे देण्यात येणाऱ्या  राज्य पातळीवरील ग्रामीण साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून पुरस्कार प्राप्त लेखकांमध्ये संदीप जगदाळे, प्रवीण बांदेकर, डॉ. प्रभाकर शेळके, बाळू दुगडूमवार  इ. लेखकांचा समावेश आहे, अशी माहिती रोहमारे ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे व पुरस्कार योजनेचे कार्यवाह डॉ. जिभाऊ मोरे यांनी येथे दिली. याप्रसंगी प्राचार्य डॉ. बी. एस. यादव, रमेशराव रोहमारे, अॕड. राहुल रोहमारे, संदीप रोहमारे, अमित रोहमारे, सुजित रोहमारे व सौ. शोभाताई रोहमारे उपस्थित होते.

भि.ग. रोहमारे ट्रस्ट तर्फे १९८९ पासून महाराष्ट्र पातळीवर ग्रामीण साहित्यातील कवितासंग्रह, कादंबरी, कथासंग्रह व समीक्षा या साहित्य प्रकारातील सर्वोत्कृष्ठ ग्रंथांना दरवर्षी हे पुरस्कार देण्यात येतात. या वर्षी २०१९ या वर्षातील पुढील ग्रंथांना हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

१. असो आता चाड – संदीप शिवाजीराव जगदाळे (कविता )  २. इंडियन ऍनिमल फार्म – प्रवीण दशरथ  बांदेकर (कादंबरी)          ३. व्यवस्थेचा बइल – डॉ. प्रभाकर शेळके (कथा संग्रह)                    ४. बाबा आमटे व्यक्तित्व, कवित्व आणि कर्तृत्व – बाळू दुगडूमवार (समीक्षा)         

प्रत्येक साहित्य प्रकारातील ग्रंथांना प्रत्येकी रोख ११,०००/-, स्मृतीचिन्ह, व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.या  ट्रस्टकडे आलेल्या एकूण ४८ साहित्यकृतींपैकी उपरोक्त ग्रंथाची निवड करण्याचे कार्यडॉ. भाऊसाहेब गमे, डॉ. शिरीष लांडगे, डॉ. गणेश देशुमख, डॉ. जिभाऊ मोरे, प्रा. विजय ठाणग  यांच्या संयुक्त निवड समितीने केले.  या ग्रॅथांशिवाय माती शाबूत राहावी म्हणून (वीरभद्र मिरेवाड), गावमातीचे अभंग (बाबाराव विश्वकर्मा), उष्ठावळ (गजेंद्र कपाटे) येजो (एकनाथ तट्टे) वाताहत (अनंता सूर),स्त्री जाणीव आणि  स्त्रीसंवेदन: एक अभ्यास (रचना) या ग्रंथांचा  या वर्षीचे उल्लेखनीय ग्रंथ म्हणून निवड समितीने विशेष निर्देश केला आहे.

जाहिरात

पुरस्कृत ग्रंथांबद्दल निवड समितीने म्हंटले आहे कि प्रवीण बांदेकर यांची इंडियन ऍनिमल फार्म हि कादंबरी मराठी वाड्मयात  एक नवीन प्रयोग आहे. राजकीय भूमिका असणं , सर्व प्रकारच्या शोषणाचा अंत करेल अशा तत्वज्ञानाशी बांधिलकी असणं , मुक्तीदायी मूल्यांसाठी किंचित हि तडजोड न करणारी माणसं … त्यांचे विचार कृती हे सारं आदर्शवत नि कालबाह्य झालेला आहे. अश्या माणसांना आज व्यवहारीक  भांडवली जगात स्थान नाही. हा, विचार ह्या कादंबरीत मांडला आहे.

‘असो आता चाड’ या संग्रहातील कवितांमध्ये माती, नाती व भवतालाचे दर्शन होते. मातीत जन्मण, मातीपासून तुटणं आणि पुन्हा मातीत रुजणं या प्रवासातील वेदनादायी अनुभव या कवितांमधून येतो. माणसं विस्थापित होतात पण त्यांच्या पायाला चिकटलेली जमीन ज्या हाका घालते, त्यांचे दीर्घस्वर या कवितेत ऐकु येतात. ग्रामीण कवी संदीप जगदाळे यांच्या या कविता आपल्याला मरणयातनांच्या निबिड गुहेतून प्रवास करायला लावून विचारसन्मुख करतात.
बदलत्या ग्रामीणजीवनाचे वर्तमान समाजवास्तव म्हणजे प्रभाकर शेळके यांचा ‘व्यवस्थेचा बइल’ हा कथा संग्रह होय. शहरी संस्कृतीचा अविभाज्य भाग बनलेले परमिट रूम, बिअरबार, टीव्ही, लॅपटॉप, मोबाईल या गरज अत्यावश्यक झाल्या. त्याने फक्त खेड्याचेच नव्हे तर ग्रामीण जीवनाचे शहरीकरण झाले. परंतु यातून तरुणांच्या बेरोजगारीचा भीषण प्रश्न उभा राहिला थोडक्यात ग्रामीण बोलीत व्यक्त झालेली तरुणाइची घुसमट, अवहेलना व दारिद्रय  यांचे वास्तव चित्रण या संग्रहातील कथांमधून येते.
‘बाबा आमटे: व्यक्तित्व, कवित्व आणि कर्तृत्व’ हा समीक्षा ग्रंथ एका कवी असलेल्या महान समाजसेवकाच्या काव्य प्रवासाचा धांडोळा घेणारा एक श्रेष्ठ ग्रंथ आहे. बाबा आमटे यांचे जगणे आणि त्यांची कविता सुद्धा अफलातून आहे. त्यानी स्वतःच्या आणि इतरांच्या आयुष्याची कविता व्हावी यासाठी संपूर्ण जीवन खर्ची घातले आहे. डॉ. बाळू दुगडूमवार यांनी बाबांचे अफलातून व्यक्तवमत्व व काव्य निर्मितीचा नेमकेपणाने वेध घेतला आहे. त्यामुळेच या ग्रंथांची यावर्षीच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे.
मागील वर्षी सदर पुरस्काराच्या वितरणाला तीस वर्षे पूर्ण होत असल्याने  पुरस्काराच्या रक्कमेत वाढ करण्यात आली आहे.  कै. के. बी. रोहमारे यांनी आपल्या वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्थापन केलेल्या भी.ग. रोहमारे ट्रस्टतर्फे सामाजिक कृतज्ञतेच्या जाणिवेतून हा उपक्रम राबविण्यात येतो. ग्रामीण नवलेखकांच्या निर्मितीक्षम मनांना  प्रोत्साहन देणे, हा या मागील मूळ उद्देश असल्याचे प्रतिपादन याप्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष श्री. अशोकराव रोहमारे व प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी केले.

जाहिरात

सदर पुरस्कार वितरणाचे हे एकतिसावे वर्ष असून पुरस्कार योजनेचे बत्तीसावे वर्ष आहे. आज पर्यंत या पुरस्काराने महाराष्ट्रातील एकशे पंचावन्न  पेक्षा जास्त लेखकांना सन्मानित करण्यात आले आहे.  या वर्षीच्या पुरस्कारांचे वितरण कोपरगावचे माजी आमदार  व कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष कै. के. बी. रोहमारे यांच्या बावीसाव्या  स्मृतिदिनी अहमदनगर येथील जेष्ठ शिक्षणतज्ज्ञ मा. प्रा. श्रीकांत बेडेकर  यांच्या शुभहस्ते व मा. श्री.सुभाष महाजन (सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक ) यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. के. बी. रोहमारे  पुण्यस्मरण व भि.ग. रोहमारे साहित्य पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमास साहित्य रसिक व नागरिकांनी सामाजिक अंतर पाळून उपस्थित राहावे, असे आवाहन कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव ऍड. संजीव कुलकर्णी व के. जे. सोमैया महाविद्यालय व के. बी. रोहमारे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker