Follow
X
Follow
नगर – मनमाड रोडवर ९३ लाख रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त
कौसर सय्यद येवला – राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय भरारी पथकाने अवैध मद्य तस्करी विरोधात कारवाई करुन येवल्यात 93 लाख 63 हजार 420 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, अं व दक्षताच्या संचालिका श्रीमती उषा वर्मा, विभागीय उपायुक्त अर्जुन ओहोळ, अधिक्षक डॉ. मनोहर अंचुळे, उपअधिक्षक श्री. भुतकर यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथक कार्यरत असतांना त्यांना गुप्त बातमीद्वारामार्फत माहिती मिळाली की, नगर – मनमाड रोडवर येवला टोलनाक्याजवळ, पिंपळगाव जलाल शिवाराजवळ अवैध मद्य घेऊन जाणारे वाहन येणार आहे. त्या गुप्त माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचला असता दहा चाकी ट्रक (एम.एच.04 डी एस 2928) संशयास्पद आढळून आला. या वाहनाची तपासणी केली असता त्यात 24 बाटल्या ब्ल्यू क्रशर व्हिस्की, 24 बाटल्या ब्लॅक पॅशन व्हिस्की 24 बाटल्या, रॉयल रायडर व्हाईट मॅजिक व्हिस्की 600 बाटल्या, रॉयल स्टॅग व्हिस्की 600 बाटल्या, रॉयल चॅलेंज व्हिस्की 600 बाटल्या, इम्पीरिअल ब्ल्यू व्हिस्की 9696 बाटल्या, रॉयल रायडर रेअर ओक व्हिस्की 2400 बाटल्या, रॉयल डबल 7 व्हिस्की 31200 बाटल्या इम्पेरिअल वॅट नं.1 व्हिस्की 1152 बाटल्या तसेच विवो कंपनीचा मोबाईल, 1 सॅमसंग कंपनीचा मोबाईल व वाहन असा एकूण 93 लाख 63 हजार 420 रुपयांचा ऐवज उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला.
या प्रकरणातील संशयित संजय साहेबराव पाटील (वय ३७६, रा.सालदार नगर, शहादा), काशीनाथ बुधा पाटील (वय ४३, रा.सालदार नगर, शहादा) यांना अटक करुन त्यांच्यावर महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमा अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सदर अवैध मद्य वाहतूकीत मोठ्या प्रमाणात मद्य तस्कारांची टोळी कार्यरत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
याबाबत उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी तपास करीत आहे. सदरची कारवाई निरीक्षक आर. एम. फुलझळके, दुय्यम निरीक्षक एस.एस. रायते, डी.एन. पोटे, जवान गोकुळ शिंदे, विठ्ठल हाके, भाऊसाहेब घुले, लोकेश गायकवाड यांनी यशस्विरित्या पार पाडली तसेच येवला, मालेगाव येथील निरीक्षक व सटाणा, नाशिक, कोपरगाव भरारीपथक यांनी शोधासाठी सहकार्य केले. पुढील तपास उपायुक्त अर्जुन ओहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरीक्षक आर.एम. फुलझळके करीत आहे